धम्म रॅलीतून दिला मैत्रीचा संदेश
धम्म रॅलीतून दिला मैत्रीचा संदेश
गृहस्थी जीवन जगणाऱ्यांना विकारापासून मुक्ती मिळावी, भगवान गौतम बुद्धांच्या काळातील श्रमण संस्कृतीचे दर्शन घडावे यासाठी आयोजित केलेल्या महाबौद्ध धम्म मेळाव्यातील भिख्खूंनी गुरुवारी शहरातून रॅली काढली. यावेळी संपूर्ण भारतातून आलेल्या भिख्खूंनी मंगल मैत्रीच्या भावनांचा संदेश दिला.
गेल्या चार वर्षांपासून होत असलेल्या महाबौद्ध धम्म मेळाव्याचा गुरुवारी तिसरा दिवस होता. मोहन अढांगळे, रमेश बनसोड व बच्छाव यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या मेळाव्याला संपूर्ण भारतभरातून दीड हजारांवर भिख्खू सहभागी झाले आहेत. दहा दिवस हा मेळावा सुरू राहणार असून, गुरुवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे चार वाजता सुरू झालेल्या कार्यक्रमांत विविध प्रकारच्या प्रार्थना घेण्यात आल्या. सकाळी भन्ते ज्ञानज्योती व भन्ते शिलरत्न यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा होत आहे. यावेळी बौद्ध धर्मात सांगितलेले आहार, विहार व विचार कसे असावेत, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. सकाळी ९ वाजता हिप्नॉटिझम व बुद्धिझम या विषयावर पुण्याचे नवनाथ गायकवाड यांचे धम्म प्रवचन व प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांकडून त्यांनी ध्यानधारणा व इतर प्रात्यक्षिके करून घेतली. त्यानंतर ११.४५ वाजता शहरातून रॅली काढण्यात आली. रॅली ज्या मार्गावरून मार्गस्थ होणार होती, त्या मार्गावर फुलांच्या पाकळ्या टाकण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे विविध सामाजिक संदेश देणारे जिवंत चित्ररथही सहभागी करण्यात आले होते. यावेळी भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रमाई आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील चित्ररथ सहभागी करण्यात आले होते. अत्यंत शांततेत, शिस्तबद्ध निघालेली रॅली गोल्फ क्लब, खडकाळी सिग्नल, शालिमार, सार्वजनिक वाचनालय, कृ. ब. महाबळ चौक, महात्मा गांधी रोड, मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, अहिल्याबाई होळकर पूल, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा मार्गावरुन म्हसरुळ येथे पोहचली. या ठिकाणी बुद्धविहाराचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यानंतर धम्म प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.
पुस्तकांचे प्रदर्शन
ईदगाह मैदानावर सुरू असलेल्या मेळाव्याच्या ठिकाणी बौद्ध धर्म विचारांच्या पुस्तकांचा स्टॉल लावण्यात आला आहे. बहुविध प्रकारची पुस्तके प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. त्यास वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Comments
Post a Comment